📰 कर्जबाजारीपणाला कंटाळून आडुळ येथील शेतकऱ्याची आत्महत्या

📰 कर्जबाजारीपणाला कंटाळून आडुळ येथील शेतकऱ्याची आत्महत्या 



(आडुळ प्रतिनिधी : सिराज बागवान)

पैठण तालुका | दि. २७ ऑक्टोबर — सततची नापिकी, अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान आणि वाढते कर्जबाजारीपण यामुळे आडुळ येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब भानुदास जंगले (वय ४७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी सोमवारी दुपारी (दि. २७) स्वतःच्या घरात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

जंगले यांच्या आडुळ शिवारात गट क्रमांक २५५ मध्ये केवळ एक एकर शेती होती. शेतीबरोबरच ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. खर्चही शेतीच्या उत्पन्नातून भरून निघाला नाही. त्यामुळे बँक व मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा मोठा बोजा त्यांच्या डोक्यावर वाढत गेला.

या आर्थिक तणावामुळे ते काही दिवसांपासून चिंतेत होते. अखेर नैराश्याच्या भरात त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. काही वेळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पाहणी केली असता त्यांचे शव लटकलेल्या अवस्थेत आढळले.

शवविच्छेदन आडुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि आई असा परिवार आहे.
या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंग दुल्हत पुढील तपास करीत आहेत.

👉 स्रोत: सिल्लोड एक्सप्रेस | www.gs9n.com


Post a Comment

أحدث أقدم