पतीकडून पत्नीवर कोयत्याने हल्ला; वडिलांनाही मारहाण
पिशोर, ता. 25 जुलै (प्रतिनिधी – अस्लम शेख):
किरकोळ कौटुंबिक वादातून पत्नीवर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वासडी (ता. कन्नड) येथे घडली. यामध्ये पतीने पत्नीला जखमी करून तिच्या वडिलांनाही मारहाण केली असून, या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऐश्वर्या दीपक भुजंग (वय २४, व्यवसाय – मंजुरी) या माहेरी वासडी येथे राहत होत्या. दिनांक २५ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांचा पती दीपक प्रभू भुजंग (रा. चिंचोली, लिंबाजी) वडिलांच्या घरी येऊन वाद घालू लागला. "मी तुला गोड लागत नाही का, बाहेर जाऊन आलीस का?" असे म्हणत त्याने शिवीगाळ केली आणि कोयत्याने डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले.
यावेळी फिर्यादीच्या वडिलांनाही आरोपीने मारहाण केली व दोघांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 268/2025 अन्वये भादंवि कलम 118(1), 115, 352, 351(2) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास बीट जमादार पंढरी इंगळे करत असून, गुन्हा दाखल करणारे अधिकारी सहाय्यक फौजदार श्रावण तायडे आहेत. आरोपीचा पूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सदर तपास सपोनि शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
