लोहगाव शिवारात तरुण शेतकऱ्याचा विषप्राशनाने मृत्यू; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून घेतले टोकाचे पाऊल
(पिशोर प्रतिनिधी : अस्लम शेख)
कन्नड तालुक्यातील लोहगाव शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीतील नुकसानीला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (अ.मृ.) क्र. 90/2025 कलम 194 बी.एन.एस.एस. अंतर्गत करण्यात आली आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव अंकुश भगवान मनगटे (वय 39, रा. लोहगाव, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे असून, त्यांनी सोमवारी सकाळी स्वतःच्या शेतात विषप्राशन केले. काही वेळातच ते बेशुद्ध पडले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
नातेवाईकांनी त्यांना तत्काळ चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबेकर यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद एम.एल.सी. क्रमांक 151/CHN/2025 अशी करण्यात आली आहे.
नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने नैराश्येतून अंकुश मनगटे यांनी आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे बीट जमादार एल.टी. नागलोत व अंसार पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार लालचंद नागलोत करीत आहेत.
लोहगाव परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
