📰 जैतखेडा शिवारात पंधरा लाखांचा गांजा जप्त — पिशोर पोलिसांची धडक कारवाई
पिशोर प्रतिनिधी – अस्लम शेख | सिल्लोड एक्सप्रेस | gs9n.com
कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिसांनी गुरुवारी (दि. १६ ऑक्टोबर) रात्री जैतखेडा शिवारात मोठी कारवाई करत तब्बल १५ लाख रुपये किंमतीचा दीड क्विंटल गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी काकासाहेब नाना वेताळ (वय ६०, रा. जैतखेडा) यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला हर्सूल कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
🔍 गुप्त माहितीवरून छापा
सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जैतखेडा शिवारातील गट क्रमांक २१५ मधील शेतात कपाशी व तूर पिकांमध्ये लपवून बेकायदेशीर गांजाची लागवड करण्यात आल्याचे समजले.
बीट जमादार वसंत पाटील यांनी प्राथमिक पडताळणी केली असता माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी छापा टाकला.
🌿 १२१ गांजासदृश झाडांची जप्ती
या कारवाईत पोलिसांना १२१ गांजासदृश झाडे सापडली. झाडांची उंची अडीच ते साडेआठ फूट होती आणि तीव्र वासामुळे लागवडीची खात्री पटली. झाडांचे एकूण वजन अंदाजे दीड क्विंटल असून बाजारभावाने त्याची किंमत सुमारे १५ लाख रुपये आहे.
पोलिसांनी झाडे जप्त करून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
👮 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक विनय कुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, तसेच सहाय्यक पोलिस अधीक्षक (कन्नड) श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत फरताडे, जमादार वसंत पाटील, रायटर विलास सोनवणे, लालचंद नागलोत, गणेश कवाल, संजय लगड, अन्सार पटेल, कौतुक सपकाळ, खंबट व पिशोर पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी सहभागी होते.
📍 स्रोत: पिशोर प्रतिनिधी अस्लम शेख
🗞️ सिल्लोड एक्सप्रेस | www.gs9n.com