🛑 नागाव समुद्रकिनाऱ्यावरील जुने बंधारे नष्ट होण्याच्या मार्गावर; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण!

🛑 नागाव समुद्रकिनाऱ्यावरील जुने बंधारे नष्ट होण्याच्या मार्गावर; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण!


📍 रायगड (प्रतिनिधी: रुबीना सय्यद)

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध नागाव समुद्रकिनाऱ्यावरील जुने पटबंधारे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्या कार्यकाळात सुमारे ६ ते ७ किमी लांबीचे बंधारे या समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आले होते. हे बंधारे कोकणातील किनारपट्टी रक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरले होते, मात्र सध्या ते पूर्णपणे ढासळत चालले आहेत.

🌊 समुद्राच्या पाण्याचा गावात शिरकाव होण्याचा धोका!

बंधारे संपुष्टात येत असल्याने समुद्राच्या लाटा आता सरळ गावाच्या दिशेने धडकत आहेत. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जर वेळेवर उपाययोजना झाली नाही, तर नागाव गावातील घरांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कोकणाला लाभलेला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा ही एक मोठी नैसर्गिक देणगी असली तरी, त्याचे रक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, असे नागावकरांचे म्हणणे आहे.

📝 स्थानिक ग्रामस्थांचे सातत्याने निवेदने दुर्लक्षित!

नागाव ग्रामस्थांनी संबंधित पटबंधारे विभागास अनेक वेळा लेखी निवेदने दिली असून, बंधारे त्वरित नव्याने बांधण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाविषयी नाराजीचा सूर गावकऱ्यांमध्ये आहे. इतकेच नव्हे तर स्थानिक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी व विरोधकांकडूनही कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.

⚠️ परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी तातडीच्या उपाययोजना आवश्यक

सध्या नागाव समुद्रकिनार्‍यावरच्या पटबंधाऱ्यांचे संरक्षण व पुनर्बांधणी ही अत्यावश्यक गरज बनली आहे. अन्यथा येत्या काळात समुद्र पाण्याचा गावावर थेट प्रभाव पडून मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रामस्थांची शासनाला स्पष्ट मागणी आहे की, तात्काळ बंधाऱ्यांचे बांधकाम हाती घेण्यात यावे, अन्यथा होणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकारास बंधारे विभाग पूर्णतः जबाबदार असेल.


✍️ सिल्लोड एक्स्प्रेस वृत्तपत्र आणि  gs9n.com 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new