आडुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता; विकासकामांमुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त.
२ दिवसांत प्रश्न सुटले नाहीत, तर ४ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
(आडुळ प्रतिनिधी – सिराज बागवान)
आडुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांनी ताशेरे ओढले असून, अनेक विकासकामे प्रलंबित असल्याने नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या अडचणीत आले आहेत. गावातील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या असून, ग्रामपंचायत प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांना अजूनही चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबत आहे आणि काही ठिकाणी चक्क तलावासारखे दृश्य दिसत आहे. परिणामी नागरिकांना दररोजच्या हालचालींमध्ये मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामपंचायतीकडे घंटागाडी असतानाही आठवड्यात केवळ दोनदाच फेरी होते, त्यामुळे नागरिकांना कचरा उघड्यावर टाकण्याची वेळ येत आहे. यामुळे संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. घंटागाडी दररोज फिरवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे काही प्रभागांमध्ये नागरिकांना महिनोंमहिने नळाचे पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनाही वेळेवर पगार दिला जात नाही. विशेष म्हणजे १५व्या वित्त आयोगाचा निधी मिळूनही शैक्षणिक सुविधांमध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही.
गावातील समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात अन्यथा ४ ऑगस्ट रोजी (सोमवार) पासून लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सतीश भालेराव (एस के टेलर) व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद शेख यांनी दिला आहे. या उपोषणात विद्यार्थी आणि पालक देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
