महिलेच्या धाडसामुळे चोरीचा प्रयत्न फसला; चोरट्याचा धारदार शस्त्राने हल्ला

महिलेच्या धाडसामुळे चोरीचा प्रयत्न फसला; चोरट्याचा धारदार शस्त्राने हल्ला


(धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे)
मुंबई-आग्रा महामार्गालगत सोनगीर फाट्याजवळील शेवंताईनगर येथे बुधवारी रात्री चोरीचा प्रयत्न झाला. मात्र घरातील महिलेच्या समयसूचकतेमुळे आणि धाडसामुळे चोरटे आपला हेतू साध्य करू शकले नाहीत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

महेश विश्वास निकम हे पत्नी आरती आणि त्यांच्या लहान मुलासह शेवंताईनगर येथे राहतात. बुधवारी रात्री ते कामावर गेले असताना आरती निकम घरात एकट्या होत्या. रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास अंगणातील लोखंडी गेट उघडण्याचा आवाज आरती यांच्या लक्षात आला. त्यांनी दार उघडून पाहिले असता चोरट्यांनी जागरूकतेची चाहूल घेत अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

आरती निकम यांनी तत्काळ आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. काही वेळ शोध घेऊन चोरटे न सापडल्यामुळे नागरिक परत गेले. परंतु काही वेळातच घराच्या जिन्यात कोणीतरी असल्याचा संशय आल्यावर आरती यांनी दरवाजा उघडला असता एक अज्ञात इसम जिन्यावरून खाली आला आणि धारदार शस्त्राने त्यांच्या दिशेने हल्ला करून दरवाज्यात लोटत पसार झाला. या झटापटीत आरती निकम किरकोळ जखमी झाल्या.

या घटनेनंतर गुरुवारी सकाळी संतप्त रहिवाशांनी सोनगीर पोलीस स्टेशन गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांची भेट घेतली. प.स.सदस्या रूपाली माळी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी निवेदन दिले. यामध्ये कॉलनीत पोलिसांनी नियमित गस्त घालावी, तसेच बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देणाऱ्या महिला:
आरती निकम, वैशाली वाघ, लक्ष्मी पाटील, दीपाली महाजन, योगिता पाटील, शालिनी महाले, कमलाबाई पाटील, वैशाली पाटील, जनाबाई धनगर, नेहा वाघ, उज्वला महाले, लताबाई पाटील आदी महिला उपस्थित होत्या.

स्थानिकांनी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारावर नाराजी व्यक्त केली असून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new