पैठण शहरातील नाली बांधकामातील भ्रष्टाचाराला आळा; मुख्याधिकारींची तत्काळ स्थळ पाहणी
पैठण प्रतिनिधी |इकबाल शेख
पैठण शहरातील पन्नालाल नगर ते लोंढे हॉस्पिटल परिसरातील नाली बांधकामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते कल्याण मगरे, प्रमोद सरोदे व नितीन शेळके यांनी उपोषण छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत मा. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. पल्लवी अंभोरे यांनी आज (बुधवार) प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.
स्थळ पाहणी दरम्यान ड्रेनेज लाईनमध्ये काँक्रीटऐवजी माती टाकल्याचे समोर आले. यामुळे संबंधित गुत्तेदारास मुख्याधिकारींनी कठोर सूचना दिल्या. त्यांनी आदेश दिला की, उद्या यंत्रणा लावून पाईप उपसून तपासणी करण्यात यावी. पाईपच्या खाली असलेली सोलिंग व पीसीसी काँक्रीट प्रत्यक्षात केले आहे की नाही हे दाखवून द्यावे. तसेच पाईपच्या बाजूस व वरच्या भागात चार-चार इंचांचे काँक्रीट टाकण्याचेही निर्देश देण्यात आले.
मुख्याधिकारी अंभोरे यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे या कामातील पंचेचाळीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार रोखला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचेही कौतुक करण्यात येत आहे.
पैठणकर नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारींचे तसेच आंदोलनकर्त्यांचे आभार मानले जात आहेत.