भटक्या कुत्र्याचा हल्ला : पिंपळनेरमध्ये सहा वर्षीय बालिका गंभीर जखमी

भटक्या कुत्र्याचा हल्ला : पिंपळनेरमध्ये सहा वर्षीय बालिका गंभीर जखमी


पिंपळनेर, दि. २२ (प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर) – पिंपळनेर शहरातील वृंदावन नगर भागात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय बालिका गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्या राकेश गांगुडे (वय ६) या बालिकेवर शनिवारी (दि. १९ जुलै) अचानक कुत्र्याने हल्ला केला. सध्या तिच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर तिला तातडीने पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्यामुळे गंभीर स्वरूप लक्षात घेता तिला धुळे येथे हलवण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वृंदावन, अलकापुरी, संभाजीनगर आणि पंचमुखी कॉर्नर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, केवळ आठवडाभरातच वृंदावन नगरमधील कुशांक राहुल भामरे (वय ६) या बालकावरही कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतला होता.

या घटनांचे व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नागरीकांच्या हृदयाला चटका लावणाऱ्या ठरत आहेत.

नगर परिषद निष्क्रिय?

नागरिकांनी याआधीच पिंपळनेर नगर परिषदेकडे लेखी स्वरूपात निवेदन देत भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त नागरिक नगर परिषदेला जबाबदार धरत आहेत. निष्काळजी प्रशासनामुळे निष्पाप चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

त्वरीत कारवाईची मागणी

या धोकादायक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांचा जीव धोक्यात न येण्यासाठी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता जनतेतून तीव्रतेने होत आहे.


gs9n.com – आपल्या भागातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ
✍️ अधिक अपडेटसाठी वेबसाइटवर भेट देत राहा.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new