तलाठ्यांनी पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळविले; चालकासह मालकावर गुन्हा दाखल

तलाठ्यांनी पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळविले; चालकासह मालकावर गुन्हा दाखल 



पिंपळनेर,दि.2(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील सतमाने रेवाडी गावादरम्यान असलेल्या नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टरसह ट्रॉली सतमाने येथील महिला तलाठ्यासह पथकाने पकडले.ट्रॉलीमध्ये 22 हजार 287 रुपये किमतीची 1 ब्रास वाळू होती.पुढील कारवाईसाठी ट्रॅक्टर निजामपूर पोलीस ठाण्यात नेत असतांना चालकाने चकवा देवून वाळूचा उपसा करीत ट्रॅक्टरसह ट्रॉली पळवून नेली.याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मालकासह चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यासंदर्भात,साक्री तालुक्यातील सतमाने रेवाडी गावादरम्यान असलेल्या नदीपात्रातून अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सतमाने येथील नवनियुक्त तलाठी सुरेश पवार यांना मिळाली.त्यानुसार प्रभारी महिला तलाठी योगिता गवई यांच्यासह इंदवे येथील तलाठी पी.आर.पाटील,सतमाने येथील बंजारा यांच्यासह पथकाने दि.30रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास सतमाने ते रेवाडी गावादरम्यान असलेल्या नदी पात्रातुन अवैध गौण खनिजाची वाहतुक करणारा ट्रॅक्टर एमएच 18 बीएक्स-6626 ट्रॉलीवर कारवाई केली.या ट्रॉलीत 22 हजार 287 रुपये किमतीची 1 ब्रास वाळू मिळून आली. ट्रॅक्टर चालक विशाल प्रकाश वाघ रा.रेवाडी,ता.शिंदखेडा, याने संबंधित ट्रॅक्टर सुपडु गुलचंद भिल रा.रेवाडी,यांच्या मालकीचे असल्याचे पथकाला सांगितले.चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत कोणतेही परवानगी आढळून आली नाही.बेकायदेशीर वाळू वाहतुक करीत असल्याचे पथकास निदर्शनास आले. त्यानंतर चालकास ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी निजामपुर पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले.मात्र त्यास त्याने नकार दिला आणि ट्रॉलीमधील वाळु नदीपात्रात खाली करुन चालक ट्रॅक्टर, ट्रोलीसह रेवाडी गावाकडे पळुन गेला.याप्रकरणी योगिता गवई यांनी निजामपुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालक विशाल वाघ,मालक सुपडु भिल या दोघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आखाडे करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने