पिशोर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त: सुमारे ९० गावांची आरोग्यसेवा धोक्यात!
(पिशोर प्रतिनिधी - अस्लम शेख)
कन्नड तालुक्यातील घाटमाथ्यावरील पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पद दोन वर्षांपासून रिक्त असून याचा थेट परिणाम जवळपास ९० खेड्यांच्या आरोग्य सेवांवर होत आहे. डॉ. अण्णासाहेब मस्के यांच्या कार्यकाळात "आनंदीबाई जोशी आदर्श रुग्णालय" पुरस्कार प्राप्त या संस्थेची अवस्था आज वाईट बनली आहे.
मनमानी कारभार आणि सेवांचा अभाव
ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक पद रिक्त असल्याने इतर कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कुठलाही वचक राहिलेला नाही. ओपीडीची वेळ सकाळी ८:३० असूनही बहुतांश डॉक्टर १०:०० नंतरच हजर होतात. त्यामुळे सकाळी दाखल झालेल्या रुग्णांना ताटकळत बसावे लागते किंवा खासगी रुग्णालयांकडे वळावे लागते.
'आभा कार्ड'चा अडथळा सामान्य रुग्णांसाठी डोकेदुखी
रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना "आभा कार्ड" अनिवार्य असल्याची अट घालण्यात आली असून, मोबाईल, ओटीपी, लिंक नसेल तर रुग्णांना परत पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सामान्य आणि ग्रामीण भागातील रुग्ण सरकारी आरोग्यसेवेपासून वंचित राहत आहेत.
औषध, एक्स-रे, प्रसूती विभाग ठप्प
औषध वितरण, प्रयोगशाळा तपासणी, अपघात व प्रसूती विभागातील सेवा अपुरी आहेत. नवीन बांधलेली प्रसूती विभागाची इमारत पूर्ण असूनही वापरात आणलेली नाही. यासोबतच अतिदक्षता विभाग, नवीन खाटा, इतर पदे आणि सुविधा यांच्याही मंजुरीसाठी पाठपुरावा केल्यानंतरही निर्णय होत नाहीये.
ग्रामपंचायतीचा इशारा – 'आरोग्य सेवा सुधारा अन्यथा उपोषण'
पिशोर ग्रामपंचायतीने वारंवार निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. दोन वर्षांपूर्वी डॉ. मोरे यांची नियुक्ती झाली होती पण तेही काही महिन्यांत निवृत्त झाले आणि तेव्हापासून पुन्हा पद रिक्त आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर माजी सरपंच पुंडलिक डहाके यांनी इशारा दिला आहे की, "जर लवकरात लवकर वैद्यकीय अधीक्षकाची नियुक्ती झाली नाही, तर मी स्वतः व माझी सून सरपंच सरला डहाके यांच्यासह उपोषणाला बसेन."
प्रशासनाचे उत्तर
सध्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक पदावर सेवा दिली जात आहे. आभा कार्ड सक्ती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार असून, रुग्णांना याबाबत समज देण्यात येते, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
या विषयावर प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा स्थानिक नागरिकांचा रोष आंदोलनात परिवर्तित होण्याची शक्यता आहे.
