पिशोरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे शिवप्रेमी नागरिकांकडून जल्लोषात स्वागत
पिशोर येथे अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेची युवक-तरुणांकडून जोरदार मागणी
(पिशोर प्रतिनिधी - अस्लम शेख)
कन्नड तालुक्यातील सारोळा येथे ६ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, दिनांक ५ ऑगस्ट रोजी पिशोर गावात या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कन्नड ते पिशोर मार्गे नेत असलेल्या या पुतळ्याचे पिशोरच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि "जय भवानी, जय शिवाजी" च्या घोषणांनी स्वागत केले.
पिशोरमधील कसबा गल्ली, जाधव गल्ली आणि संपूर्ण गावातून नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने सिल्लोड नाक्यावर एकत्र जमले होते. दुपारी चारच्या सुमारास स्वागत सोहळ्याने गावात शिवप्रेमाचे सणासारखे वातावरण निर्माण केले.
या पुतळ्याचे अनावरण दिनांक ६ ऑगस्ट रोजी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज आणि ह.भ.प. महादेव महाराज निपाणीकर यांच्या शुभहस्ते सारोळा येथे होणार आहे.
या स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने पिशोरमधील शिवप्रेमी युवकांनी गावातही अशाच भव्य अश्वारूढ पुतळ्याची उभारणी व्हावी, अशी जोरदार मागणी केली आहे. घोषणांद्वारे आणि सोशल मीडियावरून व्यक्त होत असलेली ही मागणी आता गावकऱ्यांचा एकसंघ आवाज बनत चालली आहे.
गावातील नागरिक, तरुण वर्ग तसेच महिलांकडून या मागणीला भरभरून पाठिंबा मिळत असून, "शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ गौरवशालीच नाही, तर प्रेरणादायीही आहे. पुढील पिढ्यांना तो समजण्यासाठी अशा स्मारकांची गरज आहे," असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत, सामाजिक संस्था आणि प्रशासनाने पिशोर गावातील या मागणीची तातडीने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शिवप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.