सोनगीर जलकुंभात मृत डुक्कर आढळल्याने ग्रामस्थांत संतापाचा सूर!
(धुळे प्रतिनिधी - गोकुळ देवरे)
सोनगीर (ता. धुळे) येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभात मृत डुक्कर आढळल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार आषाढी एकादशीच्या दिवशी उघडकीस आला असून, त्याच जलकुंभातून आदल्या दिवशी गावात पाणीपुरवठा झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.
सदर जलकुंभ सोनगीर किल्ल्याच्या पायऱ्यांलगत आहे. अलीकडे येथे नवीन जलकुंभ उभारण्याचे काम सुरू असून, कामगारांकडून जुना जलकुंभ झाकण्याचे झाकण उघडे राहिले होते. याच उघड्या झाकणामुळे डुक्कर जलकुंभात पडले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपासून परिसरात दुर्गंधी जाणवत होती. अखेर आषाढी एकादशीच्या दिवशी काही तरुणांनी जलकुंभाकडे जाऊन पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
या घडामोडीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "ग्रामविकास अधिकारी प्रविण ठाकरे हे गावातील अत्यावश्यक सेवा आणि स्वच्छतेबाबत गंभीर नाहीत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी," अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते दिनेश देवरे यांनी केली आहे.
केंद्र सरकार 'घर तेथे नळ' ही महत्वाकांक्षी योजना राबवत असताना, या योजनेच्या अंमलबजावणीत गावपातळीवरील हलगर्जीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. अशा घटनांमुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
📰 अधिक माहितीसाठी भेट द्या: www.gs9n.com
📍बातमी: सिल्लोड एक्सप्रेस | GS9 मराठी