पिशोर परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा: इसम नदीला पुराने माजवला हाहाकार, शेकडो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
पिशोर, २७ जुलै (प्रतिनिधी अस्लम शेख) –
पिशोर परिसरात शनिवारी, २६ जुलै रोजी सकाळपासून सुरू झालेल्या संततधारेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दुपारनंतर मुसळधार पावसाने अधिक जोर धरल्याने कोळंबी येथील इसम नदीला अचानक पूर आला आणि त्याच्या तडाख्याने परिसरातील शेतांमध्ये प्रचंड नुकसान झाले.
पुरामुळे नदीचे पाणी दोन्ही किनाऱ्यांवरून ओसंडून वाहत गेले आणि आजूबाजूच्या गावांतील मका, कपाशी, अद्रक, तुर, मुग, भुईमूग या पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोळंबी नदीसह वासडी नदीला देखील पूर आल्याने पिशोर, हसता, निंभोरा, वासडी, तपोवन, देवपूर, साखरवेल, पळशी, रामनगर तांडा, भारंब, जैतखेडा, शफियाबाद, भिलदरी, नादरपूर, पिंपरखेडा, जवखेडा, गौरपिंपरी, सारोळा, नाचनवेल, आडगाव या गावांतील शेकडो शेतकरी बाधित झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान
या नैसर्गिक आपत्तीमुळे रंगनाथ जाधव, लता जाधव, सुदाम जाधव, दत्ता जाधव, सोमिनाथ देहाडे, लक्ष्मण देहाडे, उषाबाई देहाडे, अवलोद्दीन शेख, अरुण पळसकर, हरिभाऊ डाहके, अलकाबाई उपळकर, संजय उपळकर, सांडू भोरकडे, किसन मोकाशे, शिवाजी मोकाशे, रमेश मोकाशे, कडूबा बडवे आदी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक नुकसान झाले आहे.
तत्काळ पंचनाम्याची व मदतीची मागणी
या भीषण नुकसानीनंतर शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पीडित भागातील ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.
शासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने त्वरीत हालचाली करून नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. संपूर्ण परिसर पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे अत्यावश्यक ठरत आहे.