थाळनेर पोलीस ठाण्यात लाचखोरी उघड; चार पोलीस कर्मचाऱ्यांना एसीबीचा ट्रॅप, एपीआय निलंबित
(प्रतिनिधी : गोकुळ देवरे | शिरपूर)
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्यातील लाचखोरीचा गंभीर प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळा कारवाईत उघडकीस आला आहे. गुन्ह्यात अटक न करण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यातील एकाला रंगेहात पकडण्यात आले आहे.
तक्रारदाराच्या वडिलांविरोधात अंमलीपदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सुरुवातीला ३ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. नंतर तडजोडीनंतर २ लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने एसीबी, धुळे कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.
८ जानेवारी रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाच मागणीची खातरजमा झाली. त्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी एसीबीने सापळा कारवाई राबवत तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना पोलीस कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा याला रंगेहात पकडले.
या प्रकरणात पोलीस हवालदार भूषण रामोळे, पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे व किरण सोनवणे यांचाही सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. हे सर्व कर्मचारी थाळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस ठाण्यावर योग्य नियंत्रण न ठेवल्याच्या कारणावरून प्रभारी एपीआय शत्रुध्न पाटील यांना तात्काळ निलंबित केले आहे. तसेच, थेट ट्रॅपशी संबंधित असलेल्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
थाळनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी एपीआय हेमंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली असून, ते यापूर्वी शिरपूर पोलीस ठाण्यात दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत होते.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित एसीबी प्रकरणाचा पुढील तपास व विभागीय चौकशी सुरू आहे.