नेपूर गावात विवाहबाह्य संबंधामुळे तरुणाची आत्महत्या
पत्नी व प्रियकर अटकेत, न्यायालयाकडून १४ दिवसांची पोलीस कोठडी – इतर आरोपी फरार
(पीशोर प्रतिनिधी : असलम शेख)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नेपूर गावात विवाहबाह्य संबंधातून उद्भवलेल्या कौटुंबिक वादामुळे एक तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समाधान सर्जेराव खेळवणे (वय ३२) याने १८ ऑगस्ट रोजी जीवन संपवले.
फिर्यादीची माहिती
२१ ऑगस्ट रोजी समाधानच्या भावाने पिशोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यात नमूद केले आहे की, समाधानच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर त्याच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. पत्नी, तिचे सासरवाडीतील लोक व प्रियकर यांनी मिळून शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले.
पोलिसांची कारवाई
प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी पत्नी वैशाली समाधान खेळवणे व तिचा प्रियकर भावराव बाळू यांना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने दोघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
तपासाची दिशा
या प्रकरणाचा तपास शिवाजी नागवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फडताळे साहेब, बीट अंमलदार नागलोत सर, विलास सोनवणे, गणेश कवाल व अन्सार पटेल करीत आहेत. घटनास्थळाचा पंचनामा, पुरावे संकलन व जबाब नोंदीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुन्हा सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
गावकऱ्यांचा संताप
नेपूरसारख्या शांत गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. मृतक समाधान मेहनती व साधा स्वभावाचा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पत्नी व प्रियकरासह सासरच्या मंडळींच्या त्रासामुळे त्याला आत्महत्या करावी लागली, याबाबत गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व संतापाची लाट उसळली आहे.