बिबट्या अधिवास क्षेत्रात जनजागृती मोहीम : ग्रामीण जनतेला स्वसंरक्षणाची माहिती
पिशोर प्रतिनिधी – अस्लम शेख
कन्नड (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अंतर्गत शिवराई व हतनूर गावांमध्ये वनविभागाच्या वतीने बिबट्या अधिवास क्षेत्रात घ्यावयाच्या काळजीसंदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गावांमध्ये माहितीपत्रके (पॉम्पलेट्स) लावण्यात आली तसेच जनतेशी थेट संवाद साधण्यात आला. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांनी माहिती देताना सांगितले की, ग्रामीण जनता तहसील कार्यालय, पंचायत समिती, एसडीएम ऑफिस, ग्रामीण रुग्णालय तसेच भूमी अभिलेख कार्यालय अशा शासकीय ठिकाणी वारंवार भेट देते. त्यामुळे त्या ठिकाणीही माहितीपत्रके लावण्यात आली आहेत. यामुळे ग्रामीण जनता ही माहिती वाचून बिबट्यापासून स्वसंरक्षणार्थ आवश्यक ती काळजी घेईल व भयमुक्त वातावरणात राहण्यास मदत होईल.
टोम्पे यांनी पुढे सांगितले की, कार्यक्षेत्रातील सर्व संवेदनशील गावांमध्ये टप्प्याटप्प्याने माहितीपत्रके लावून जनजागृती करण्याचा मानस आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये बिबट्यांच्या हालचालीबाबत जागरूकता वाढेल तसेच वनविभागाशी समन्वय साधण्यास सोपे जाईल.
