आडूळसह परिसरात गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत पार
🗓️ दिनांक : ७ सप्टेंबर २०२५
✍️ (अडुल प्रतिनिधी सिराज बागवान)
आडूळ : आडूळसह रजापूर, घारेगाव, गेवराई, पारूंडी, ब्राह्मणगाव, दाभरुळ, एकतुनी, पांढरी पिंपळगाव आदी गावांमध्ये शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) गणेश विसर्जन मिरवणुका अत्यंत उत्साहात आणि शांततेत संपन्न झाल्या.
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा गजरात गावोगाव गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. ढोल-ताशे, टाळ-मृदुंगाच्या गजरात, गुलालाची उधळण करत गणेश मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता आडूळ येथील वेशीतून मिरवणुकीला प्रारंभ झाला. सुमारे पाच तास चाललेल्या या मिरवणुकीचा समारोप रात्री दहा वाजता झाला. ठेक्यावर थिरकणारे तरुण, पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि भक्तीभावाचे वातावरण यात गावभर जल्लोष पहायला मिळाला.
या मिरवणुकीत युवासेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख शुभम पिवळ, सरपंच बबन भावले, उपसरपंच भाऊसाहेब पिवळ, माजी उपसरपंच शेख जाहेर, तसेच किरण वाघ, रामू पिवळ, दिलीप जैस्वाल, भाऊसाहेब वाघ, सुनिल पिवळ, सुधाकर छडीदार, अंबादास पिवळ, सय्यद शाम्मद आदींसह गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संपूर्ण मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, बीट जमादार रणजितसिंग दुल्हत, तसेच नागनाथ केंद्रे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
गावोगावच्या गणेश भक्तांनी पारंपरिक वादन, सजावट आणि भक्तीभावाने विसर्जन सोहळा अविस्मरणीय केला.
