मराठा सेवा संघ उत्तर महाराष्ट्र विभागीय उपध्यक्षपदी सागर भदाणे यांची निवड
मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे | सिल्लोड एक्सप्रेस | gs9n.com
दोंडाईचा : उत्तर महाराष्ट्रासाठी मराठा सेवा संघाच्या विभागीय उपध्यक्षपदी नगाव येथील सागर भदाणे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड मराठा सेवा संघाच्या मालोजीराव भोसले सभागृहात सम्राट बळीराजा गौरव दिनाच्या औचित्याने झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली.
या कार्यक्रमात मराठा सेवा संघाच्या नाशिक विभागीय तसेच जिल्हा कार्यकारी समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतीय उपाध्यक्षा सुलभा कुवर उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, लीलाधर पाटील, पत्रकार रमेश दाणे, जादूटोणा विरोधी समितीचे अविनाश पाटील, सेवा संघाचे राज्य सहसचिव चंद्रशेखर भदाणे, प्रांत समन्वयक दीपक भदाणे, संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष मोहन देसले, मोहन पाटील, जयंत पाटील आदी मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी केले, सूत्रसंचालन सचिव डॉ. सुनील पवार यांनी केले तर सहसचिव संजय पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
यापूर्वी सागर भदाणे यांनी मराठा सेवा संघात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी जिल्हा सचिव, जिल्हा सहसचिव, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा कोषाध्यक्ष या पदांवर कार्य केले आहे. तसेच ते धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतपेढीचे माजी चेअरमन, धुळे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि निसर्ग मित्र समितीचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.
सागर भदाणे यांच्या नियुक्तीबद्दल मराठा सेवा संघात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या नेतृत्वातून संघटनात्मक कार्य अधिक वेग घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
