अर्ज द्या, कर्ज घ्या" शिबिरास पिशोरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्याचरण कडवकर यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, शेतकरी आणि बँक अधिकाऱ्यांचा सकारात्मक संवाद
पिशोर (प्रतिनिधी – अस्लम शेख)
शेतकऱ्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार “अर्ज द्या, कर्ज घ्या” या विशेष अभियानांतर्गत पिशोर येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी कृषी कर्ज योजना, पुनर्गठित कर्ज योजना, विविध अनुदानित योजना, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच कर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा सविस्तर आढावा घेत, उपस्थित शेतकऱ्यांना अत्यंत अभ्यासपूर्ण व स्पष्ट मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास तालुका सहाय्यक निबंधक विनय धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी बळीराम मोकासे, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे प्रतिनिधी, वसुली अधिकारी बापूसाहेब जाधव, कॅशियर कृष्णा जाधव यांची उपस्थिती होती. याशिवाय भागचौक व सनिक परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते.
शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत आपल्या अडचणी व शंका मांडल्या. बँक प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांवर समाधानकारक उत्तरे देत, सहकार्याची ग्वाही दिली. शासनाच्या योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
या उपक्रमामुळे शासन, बँक व शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक बळकट झाला असून, शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामीण भागात प्रभावीपणे होण्यासाठी याचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.