प्रवासादरम्यान महिलेचे ₹५.५७ लाखांचे दागिने लंपास
कन्नड बसस्थानक ते कोळसवाडी दरम्यान चोरट्याचा डल्ला
पिशोर, प्रतिनिधी – अस्लम शेख
रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरी जाणाऱ्या महिलेच्या पर्समधून तब्बल ₹५.५७ लाख किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
घटना कन्नड तालुक्यातील कोळसवाडीजवळ घडली. कविता दीपक दाभाडे (वय ३२, रा. शिवनगर कॉलनी, कन्नड) या फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव येथे माहेरी जाण्यासाठी कन्नड बसस्थानकातून एस.टी. बसने प्रवास करत होत्या. दरम्यान, त्यांच्या पर्समधील दागिने चोरीस गेले.
पीडित महिलेचा भाऊ पिशोर बसस्थानकावर त्यांना घेण्यासाठी आला असता, दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. कन्नड बसस्थानक ते कोळसवाडी या प्रवासादरम्यान चोरट्याने हा डल्ला मारला. चोरी गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ₹५,५७,००० इतकी असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची नोंद पिशोर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, ही घटना कन्नड शहर हद्दीतील असल्याने पुढील तपासासाठी प्रकरण कन्नड शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.