धाडचा पशुवैद्यकीय दवाखाना बेवारस, अधिकारी बेपत्ता

धाडचा पशुवैद्यकीय दवाखाना बेवारस, अधिकारी बेपत्ता

(धाड प्रतिनिधी अबूजर मिर्झा)│


शेतकरी आणि पशुपालकांसाठी जीवदान ठरणारा वर्ग-१ राजपत्रित पशुवैद्यकीय दवाखाना सध्या अक्षरशः कुलूपबंद आहे. लाखोंचा पगार घेणारे अधिकारी व परिचर महिनोनमहिने दवाखान्यात गैरहजर असून, प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी पशुधन विकास अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला असला तरी त्यांचीही सतत गैरहजेरी आहे. परिचर देखील हजर राहत नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना दरवाज्यावर कुलूपच दिसते.

दरम्यान, लम्पी, लाळ्या-खुरकूट (FMD), ब्रुसेलोसिस, कृत्रिम रेतन, व्यंधत्व निवारण यांसारख्या आजारांवरील उपचार ठप्प झाले आहेत. लम्पी आजार झपाट्याने पसरत असून, दुग्ध व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. गाई-म्हशींना आजार झाल्याने दूध उत्पादन घटले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

उपचारासाठी त्रस्त शेतकऱ्यांना खासगी पशुसेवकांकडे धाव घ्यावी लागत आहे. मात्र येथे एका गाई-म्हशीसाठी तब्बल 500 रुपये शुल्क आकारले जात असून, शेतकऱ्यांची लूटमार होत असल्याचे उघड झाले आहे.

दवाखान्याची सध्याची अवस्था अधिकच दयनीय आहे. आवारात कचऱ्याचे ढीग, गटारांचे पाणी आणि ढासळलेल्या भिंतींमुळे या ठिकाणाला ‘दवाखाना’ म्हणणेही अवघड झाले आहे.

शेतकरी व पशुपालकांनी वारंवार तक्रारी करूनही पंचायत समिती व जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनातील उदासीनतेमुळे खासगी व्यवसाय फोफावत आहेत, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतो आहे.

अधिकृत वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 अशी असली तरी प्रत्यक्षात दरवाजे कायम बंद असतात. उपचारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना दरवेळी निराश होऊन परतावे लागते. शेवटी शेतकऱ्यांना खासगी उपचार घेऊन मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.

याला जबाबदार कोण? हा प्रश्न ग्रामस्थ आणि पशुपालकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new